अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- महिनाभर शांत राहिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे परत एकदा कामाला लागले आहेत. चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे देशव्यापी जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी दि.१० मार्चपर्यंत कार्यकर्त्यांनी संपर्क साधावे असे आवाहन केले आहे.
या कार्यकर्त्यांमार्फत विविध प्रश्नांवर एकाचवेळी ठिकठिकाणी आंदोलने करून सरकारवर दबाव आणण्याची त्यांची योजना आहे. पक्ष-पार्टीशाहीला खरी लोकशाही दाखवून देण्यासाठी ही चळवळ असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेले आंदोलन अण्णांनी मागे घेतल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
त्यानंतर आता महिनाभरात त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरवात केल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही राज्यघटनेत अपेक्षित असलेली खरी लोकशाही आली नाही. १९५२ मध्ये देशात पहिली निवडणूक झाली. घटनेत पक्ष आणि पार्ट्यांना स्थान नाही.
तरीही पहिल्याच निवडणुकीत पक्ष आणि पार्ट्यांनीच घटनाबाह्य निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन निवडणूक आयोगाने पक्ष-पार्टीच्या निवडणुकीला मनाई करायला हवी होती, पण तसे झाले नाही. तीच पद्धत आजतागायत सुरू आहे. त्यामुळे देशात जी लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही यायला हवी होती ती आली नाही. त्याऐवजी पक्ष-पार्टीशाही आली.
सरकार कोणत्याही पक्ष-पार्टीचे असो त्यांच्यावर जनशक्तीचा दबाव असला पाहिजे. या पुढील काळात अहिंसेच्या मार्गाने समविचारी लोकांचे जनहित, राज्यहितासाठी एकाच वेळी जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर आंदोलने झाली तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील, त्यासाठी ध्येयवादी कार्यकर्त्यांचे संघटन वाढवण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|