अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- घरफोड्या करणार्या एक सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
भगवान ईश्वर भोसले (वय 21 रा. बेलगाव ता. कर्जत) असे चोरट्याचे नाव असून रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सोनाराची नाव आहे.
दरम्यान वरील आरोपीने नगर ग्रामीणसह पारनेर तालुक्यात घरफोड्या व जबरी चोरी केलेल्या 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 25 तोळे सोन्यासह, दोन वाहने, दोन मोबाईल असा 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रिमा वालचंद धाडगे (रा. वडगाव तांदळी ता. नगर) यांचे घर फोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लंपास केला होता. धाडगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पथक ग्रामीण भागात झालेल्या घरफोड्यांचा तपास करत होते.
धाडगे यांची घरफोडी भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी मिळून केली, भगवान भोसले व त्याचा भाऊ संदीप भोसले हे दोघे दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी शिरूर कासार येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
दरम्यान तात्काळ पोलीस पथकाने कडा ते शिरूर रस्त्यावर सापळा लावून भगवान भोसलेला अटक केली. त्याच्या सोबत असलेला भाऊ संदीप भोसले पसार झाला. आरोपी चोरी केलेले सोने राम इंगळे या सोनाराकडे विक्री करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी इंगळे याला अटक केली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|