२०१४ च्या विधानसभेच्या हिशोबाचे मी तोंड उघडले तर शहरात फिरता येणार नाही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत पराग संधानसह सेना-भाजपाच्या नगरसेवकांवर सडकून टीका केली असताना आता सेना-भाजप नगरसेवकांनीही पत्रकार परिषदेमधून विजय वहाडणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

२०१४ च्या विधानसभेच्या हिशोबाचे मी तोंड उघडले तर विजय वहाडणे यांना शहरात फिरता येणार नाही, असा इशारा अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी दिला आहे.

पुढे बोलताना संधान म्हणाले,२५ वर्षापासून माझा व्यवसाय कायदेशीर आहे, परंतु केवळ मूळ विषयाला बगल देण्यासाठी बेछूट आणि बेताल आरोप करणाऱ्या वहाडणे यांनी त्यांचा व्यवसाय सांगावा.

विघ्नेश्वर मैदानात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा. बेताल वक्तव्य करणाऱ्या वहाडणे यांची ३० वर्षाची राजकीय कारकीर्द केवळ काळे-कोल्हे यांच्या नावाने शंखनाद करण्यात गेली,असा टोला भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी लगावला.

वहाडणे यांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे कोल्हेंनी पराभवाचा वचपा काढला, मला काम करू दिले नाही,शहर विकासाला खीळ घालतात, अतिक्रमण काढण्यासाठी मला पुढे करतात, गेल्या साडेचार वर्षापासून हाच राग त्यांनी वारंवार आळवला.

आमचा आवाज दाबण्यासाठी व्यक्ती द्वेषातून आरोप करून बदनामी करण्याचा केविलवाणी प्रयत्न वहाडणे करीत आहे.त्यांच्या वैयक्तिक गोष्टी बाहेर काढल्या तर यांना शहरातून फिरणे मुश्कील होईल पण ती आमची संस्कृती नाही, अशा शब्दात उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी टीका केली.

विजय कन्स्ट्रक्शनला बिल देऊ नका, असा ठराव मी केला. त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे. तीन कोटीचा चेक तुम्ही दिला,यातील मलिदा कोणाला मिळाला हे जनतेला ठाऊक आहे,अशी टीका विजय वाजे यांनी केली.

आम्ही संघटनेचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा केला, तुमच्या वंदेमातरमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे गेला ? असा सवाल कैलास जाधव यांनी केली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News