कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने घेतला हा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल आढावा बैठक घेतली.

रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्यासाठीची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तहसीलदारांना तसेच महानगरपालिका यंत्रणेला दिल्या आहेत.

करोना रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकांच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या पूर्वकाळजीविषयक सूचना आणि प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन काही जणांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे करोना रुग्णाच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहर्‍यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून आता दंडाची रक्कमही पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

याशिवाय, शासकीय कार्यालयात आता मास्क नाही-प्रवेश नाही, याची कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोबर मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News