बोधेगाव :- दिवाळी सणासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी कपडे तसेच फराळ घेऊन दुचाकीवरून पुण्यावरून आपल्या मुळ गावी परतत असताना पुणे-नगर महामार्गावर सुपा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दिलेल्या धडकेत बोधेगाव येथील दोन कुटुंबांतील दोघा नवतरुणांचा जागीच करुण अंत झाला.
विशेष म्हणजे दोघेही त्यांच्या कुटुंबांतील एकुलते एक मुलगे होते. येथील संकेत अशोक शिंदे (वय २१) आणि विकास सोमनाथ शिंदे (वय २२) अशा त्या दोघा तरुणांची नावे असून ते पुण्यावरून दिवाळी सणाकरिता आपल्या कुटुंबीयांकडे दुचाकीवरून पुणे-नगर महामार्गावरून बोधेगावला येत होते. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सुपा, (ता. पारनेर) जवळील त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच करुण अंत झाला. दोघांच्या मृतदेहावर पुढील उत्तरीय तपासणी पारनेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी भर पावसात मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवयुवकांच्या मृत्यूची वार्ता बोधेगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अपघाती मृत्यूने मोठा आघात झालेले दोन्ही शिंदे कुटुंब परिस्थितीने गरीब असून त्यांच्या परिवारातील एकुलत्या एक कर्त्या मुलांनी असा अचानक जगाचा निरोप घेतल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोधेगावात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
संकेतच्या पाठीमागे अपंग आई, वडील, तीन बहिणी असा परिवार, तर विकासच्या मागे आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. दिवाळी सण साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे परिवारात आपापल्या एकुलत्या एक मुलाच्या अचानक मृत्यूची बातमी गुरुवारी भल्या सकाळीच समजल्याने गावात एकच खळबळ उडाली.
दोघा तरुणांच्या जीवनकाळातील गोष्टींची माहिती सांगताना रहिवाशांचे अश्रू थांबत नव्हते. मृत युवकांचे मृतदेह गावातच येताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या आई-वडील, बहिणींसह नातेवाईक महिलांनी केलेला आक्रोश या वेळी पडणाऱ्या मुसळधार पावसापेक्षा मोठा वाटत होता. गहिवरलेल्या परिस्थितीने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या होत्या.
- कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत