अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यातल्या चौहटन तालुक्यात असलेल्या पनोरिया गावामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय रिक्षाचालक गजेदानला आयकर विभागाने 4.89 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.
ही नोटीस पाहून गजेदानला धक्काच बसला. राजस्थान आयकर विभागानं गजेदानला 32.63 कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी 4.89 कोटी रुपयांच्या थकबाकी टॅक्सबाबत ही नोटीस पाठवली आहे. हा व्यवहार त्याच्या पॅनकार्डचा वापर करुन एका बिझनेस अकाउंटमार्फत करण्यात आला आहे.
गजेदाननं सांगितल्याप्रमाणं, ‘तो रिक्षा चालवतो. याचसोबत तो एक दुकान देखील चालवतो. महिन्याला तो 8 ते 10 हजार रुपये कमवतो.’ गजेदानने बाखासर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यानं असं म्हटलं आहे की, ’11 फेब्रुवारी 2021ला राज्याच्या टॅक्स डिपार्टमेंटकडून 4.89 कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याबाबत मला नोटीस आली आहे.’
पीडित गजेदाननं आरोप केला आहे की, ‘मी पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक आणि अन्य माहिती चौहटन गावातील एका फायनान्स कंपनीला दिली होती. एका वर्षापूर्वी मी रिक्षा खरेदी केली होती आणि त्यासाठी फायनान्स करण्यासाठी आपली कागदपत्रं दिली होती.
रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त मी किराणा मालाचे दुकान देखील चालवतो. त्याठिकाणी ग्रामीण भागातील लोकांचे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी मी एक-दोन कंपनीचे आयडी घेतले होते. त्यासाठी देखील मी कागदपत्र दिली होती. कोणी तरी माझ्या या कागपत्रांचा वापर करुन फसवणूक केली असावी आणि मला याची माहिती नाही.
‘ पीडित गजेदाननं आरोप केला आहे की, ‘एखाद्या व्यक्तीनं माझ्या नावावर जीएसटी (GST) फर्म मेसर्स एसएलव्ही इंटरनॅशनल नोंदणी केली असावी. ज्याच्या नोंदणीमध्ये मोबाईल नंबर आणि इमेल आयडी माझा नाही. माझ्या नावानं कोणीतरी बनावट फर्मची नोंदणी केली आहे.
या फर्मकडून 32 कोटी 63 लाख 65 हजार 440 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्यावर जीएसटी थकबाकी 4 कोटी 89 लाख 99 हजार 724 रुपये असून, चुकीचं ओझं माझ्यावर टाकण्यात आलं आहे. अशाप्रकारचा कोणताही व्यवहार मी कधीच केला नाही.’
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|