अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या कुटुंबाने घेतली आहे.
रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला काही राजकारणी वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी हत्याकांड प्रकरणाचा तपास चांगला केला मात्र आरोपीला अटक करू नये यासाठी पोलीस वर दबाव असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
या मागणीसाठी रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा जाहीर केला असून बाळ बोठेला अटक करा ,त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना अटक करा अशी भूमाता ब्रिगेडचीही मागणी आहे असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.
दरम्यान रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले. दरम्यान, न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात बाळ बोठे याचा सहभाग आढळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्टँडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १ मार्चच्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर गुरूवारी न्यायालयाने अंतिम आदेश दिला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|