अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कोरोना बाधित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने औरंगाबाद शहरात सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणेने चाचपणी सुरू केली आहे. अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. रविवारी सायंकाळपर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात गेल्या तीन दिवसांत तीनशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण् आढळून आले आहेत. कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे औरंगाबाद शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. यामुळे प्रशासन कठोर निर्णय घेणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपासून १० दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.
शहरात दररोज किमान दोन हजार नागरिकांची तपासणी होत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा १२ ते १५ टक्के इतका आहे. साधारणपणे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असेल तर कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते. मात्र, शहराचा हा रेट १२ ते १५ टक्क्यांवर गेल्यामुळे कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचे सुत्रांनी सांगितले.
या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी सात कोविड केअर सेंटरसह ४० खासगी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात बाधित रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. तीन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
एका घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली तर ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे तीनशे कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्य कोरोनाबाधित निघाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|