या’ शहरात जनता कर्फ्युची घोषणा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- काेरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन विविध उपाय योजनांची अंमलबाजावणी करत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे.

११ ते १५ मार्च या कालावधीत जळगाव शहरात जनता कर्फ्यू राहील, असे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केले. जळगाव शहराच्या हद्दीत ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत.

या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोनाची साखळी तोडण्यासठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

या तीन दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत. सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.

यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही करोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यानुसार जळगाव शहरात आता तीन दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा, पानटपरी,

हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत. वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा; नियोजित परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक,

कोविड लसीकरण सुरू राहील तसेच अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळेल. शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही सांगण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe