अज्ञात रोगामुळे जनावरे दगावली; पशुवैद्यकीय अधिकारीही संभ्रमात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- राहाता तालुक्यातील वाळकी गावात गेल्या आठ दिवसांपूर्वी काही दुभती जनावरे मृत झाली उपचार करूनही या जनावरांना उपयोग न झाल्याने रोज वेगवेगळ्या ठिकाणी ही जनावरे मृत झाली.

याची दखल पशु वैद्यकीय विभागाने घेत नगर, राहाता, दहेगाव व शिर्डी येथील पशुवैद्यक विभागाची चार पथके या गावात जनावरांवर उपचार करत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चार पथके उपचार करत असून अद्यापही या रोगाचे निदान न झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

शालिनीताई विखे यांनी आज वाळकीत जाऊन या बाधित जनावरांची पाहणी केली. आता पर्यंत तालुक्यातील आठ जनावरे मयत झाली असून 10 हून अधिक बाधीत असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून खाद्य, पाणी व चार्‍याचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे उपचार करणार्‍या पथकातील डॉ.पवार यांनी सांगितले. मच्छिंद्र शिरोळे, गंगाधर शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, प्रभाकर शिरोळे, बाळासाहेब शिरोळे या शेतकर्‍यांच्या 7 गायी व 1 बैल मयत झाला आहे.

खाजगी व सरकारी पशु वैद्यकीय विभागाने अनेक उपचार करूनही रोगाचे निदान होत नाही व जनावरे दगावत आहे, यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार व जिल्हा परीषदेने तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकांना एक दिवस वाळकीत काम करण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तुंबारे यांनी दिल्या असून ठरवून दिलेल्या दिवशी तालुक्यात सेवा देणार्‍या डॉक्टरांनी मदत करण्याचे आदेश यावेळी दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe