अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. याच्या भीतीमुळे अनेक जण रात्ररात्रभर झोपत नाहीत. काही जणांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. तर काहींची झोपच उडाली आहे. हा आजार म्हणजे कोरोनोसोम्निया आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू पुन्हा वाढ होत असल्याने पुढे काय होईल या भीतीने निद्रानाशाचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
सततच्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. या स्थितीला कोरोनासोम्निया म्हणतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये भावनांचे नियमन करण्याची क्षमताही क्षीण होते. त्यामुळे मनावरचा ताण वाढतो आणि अधिक त्रासदायक परिस्थितीशी सामना करावा लागतो. आर्थिक अस्थैर्य, विषाणूची भीती, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यामध्ये समतोल सांभाळता येत नसल्याच्याही तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे.
पल्मोनोलॉजिस्ट व निद्रा औषध तज्ज्ञ डॉ. अंशु पंजाबी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस’ने दीडशे लोकांची पाहणी केली. त्या पाहणीमध्ये दीडशेपैकी २५ ते ३० टक्के व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास होता. तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या झोपेची गुणवत्ताही बिघडल्याचे दिसून आले.
काम, जेवणाच्या वेळा, व्यायाम आणि झोप यांचे एक नियमित वेळापत्रक बनवा. घरून काम करत असतानाही कामाला जात असताना जे वेळापत्रक होते ते सुरू ठेवा. या वेळापत्रकाचे पालन केल्यामुळे शरीराची क्रिया व्यवस्थित सुरू राहते. झोपण्यापूर्वी अर्धा ते एक तास मन शांत होण्यास मदत होत असलेले हलके संगीत लावा.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे शरीरावर परिणाम होतो. शांत झोपेसाठी मोबाइल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्यासह झोपण्यापूर्वी नेट सर्फिंग करणे टाळा. चहा आणि कॉफीमधून मिळणारे कॅफेन शरीरात आठ तास राहते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|