राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

कयार चक्रीवादळापाठोपाठ आता महाचक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. लक्षद्वीप व लगतच्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर हे वादळ घोंघावत आहे. तसेच कयार वादळही पश्चिमेमध्ये अरबी समुद्रावर आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असून, येत्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आगामी पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पडत असलेल्या पावसाला कयार कारणीभूत होते. आता महाचक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीच्या भागाला काही प्रमाणात आहे. दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवस समुद्र खवळलेला असणार आहे. या चक्रीवादळाचा फटका केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप या भागांमध्ये बसणार असून, येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे.

४ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment