अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यांनी कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची बाधा झाल्याने या लस बाबत विचारमंथन केले जात आहे.
साईसंस्थानच्या कोविड उपचार केंद्राच्या उभारणीत सक्रीय व महत्वाचे योगदान असलेले डॉ. वडगावे आजवर कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी ठरले होते. वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धयांना लसीकरण सुरू झाल्यानंतर डॉ. वडगावे यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली लस घेतली होती.
त्यानंतर जवळपास दोन आठवड्यापूर्वी फेब्रुवारीच्या अखेरीस त्यांनी लसीचा दुसरा डोसही घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सर्दी खोकला असल्याने त्यांनी आज मंगळवारी सायंकाळी कोरोनाची अॅन्टीजेन चाचणी केली. त्यात डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने या लसीकरणाच्या उपयोगितेबाबत शंका उपस्थित होत आहेत.
डॉ. वडगावे यांनी त्यांचे लसीकरण झालेले असल्याच्या व अॅन्टीजेट टेस्ट पॉझिटीव्ह आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठीही त्यांनी स्वॅप दिला असून त्याचा अहवाल लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अॅन्टीजेन टेस्टची विश्वासार्हता नसली तरी शासकीय नियमानूसार संबधित व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह म्हणून समजली जाते.
काहीही असले तरी लस घेतली तरी मास्क लावणे, स्वच्छता पाळणे, अंतर राखणे आदी गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यकच असल्याचे यातून समोर आले आहे. दरम्यान साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या सुचनेनुसार शिर्डीत साईबाबा संस्थान रूग्णालयात कोरोना लसीकरण सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
डॉ. वडगावे यांच्या नेतृत्वाखालीच ही लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे येत्या गुरूवार पासून साईसंस्थान रूग्णालयाकडून प्रती व्यक्ती अडीचशे प्रमाणे लस देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|