अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्यांसाठी लागू करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून दिल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य स्तरावर समिती नेमून या योजनेबाबत आढावा घेण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन हवामानावर आधारीत पीक विमा योजना राज्यात सुरू करण्यात आली.
यापूर्वी या योजनेची अंमलबजावणी सरकारच्या कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून होत होती. परंतु यामध्ये खासगी कंपन्याही आता मोठ्या प्रमाणात आल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिले नसल्याची बाब आ. विखे पाटील सभागृहात गांभीर्याने उपस्थित केली.
शेतकर्यांनी या विमा कंपन्याची पॉलिसी घेतली तर भरपाई देण्याच्या वेळेस नेमके यांचे ट्रिगर पॉइंट आडवे येतात, त्यांचे निकषही ठरलेले असतात. त्यामुळे शेतकरी हप्ता भरुनही या योजनेचा लाभ मिळवू शकत नाही. खासगी विमा कंपन्याच जादा नफा कमवत असल्याची गंभीर बाब आ. विखे पाटील यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारच्या लक्षात आणून दिली.
पीक विमा योजनेतील त्रुटीबाबत मांडलेल्या या वस्तुस्थितीची दखल घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने या विमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यासाठी राज्य स्तरावरच समिती नेमून बदल करण्याबाबतची ग्वाही दिली.
विधिमंडळाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनात आ. विखे पाटील यांच्या मागणीला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|