विखेंच्या कार्यकर्ता मेळाव्यात नियमांचे उल्लंघन; पोलीस प्रशासन कारवाई करणार का ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कोरोनाचे संकट असताना श्रीरामपूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असताना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान शुक्रवारी विखे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी गर्दी जमल्याने करोना प्रतिबंधक नियमांचा भंग झाल्याची चर्चा सुरू होती.

पोलीस अधीक्षक पाटील आज श्रीरामपूरमध्ये होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना यासंबंधी प्रश्न विचारला. करोना संसर्ग टाळण्यासाठी लग्न, मेळावे आणि अन्य गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आहे.

असे असूनही हा कार्यक्रम कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर पाटील यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचा आदेश श्रीरामपूर पोलिसांना दिला आहे.

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात त्यानंतर सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी चौकशी करून, माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान नगर जिल्ह्यात आणि श्रीरामपूर तालुक्यातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहेत.

अनेक ठिकाणी लग्न समारंभांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे राजकीय मेळाव्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe