अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत असून काल बुधवारी उच्चांकी 83 रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये सर्वाधीक शिर्डीत 22 रुग्ण, राहाता 17, लोणी बु. 13, लोणी खुर्द 10, कोर्हाळे 4, यासह एकूण 17 गावांत करोनाचे एक-दोन रुग्ण सापडत आहेत.
मोठ्या झपाट्याने करोनाचा प्रसार ग्रामीण भागातही सुरू झाला असून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी नागरिकांना लक्षणे दिसत असतानाही काही जण चाचणी करून घेत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
दरम्यान शिर्डी नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी व श्रीकृष्णनगर या भागात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्ण सापडत असल्साने हा परिसर 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजेपासून 23 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधीत करण्यात आला असून
या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे तसेच बाहेरील नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे आदेश राहाता तहसीलदारांनी दिले आहेत.
तसेच वाढत्या करोनामुळे राहाता शहर गुरूवारी बंद ठेवण्यात येत असून साकुरीही बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
शिर्डी येथील करोना सेंटरमध्ये 57 रुग्ण उपचार घेत असून वाढत्या रुग्णसंख्येनुसार आरोग्य विभाग सतर्क असल्याची माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोकुळ घोगरे यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|