अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शनिवारी रोजी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही परिसरात गारांचा खच पडला.
या पावसाने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, चितळी, साकेगाव, डांगेवाडी, कासार पिंपळगाव , हनुमान टाकळी, गावासह परीसरातील गावात गारपीट तर शेवगाव तालुक्यातील आव्हाणे, वडुले,
वाघोली, ढोरजळगाव तर नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव, कुकाणा परिसरात देखील कमी अधिक प्रमाणात पाऊस व गारपीट झाली झाली.
या गारपिटीने शेतकऱ्यांचे कांदा, गहू व इतर चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून वातावरणात बदल झाले असून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलाच होता, त्याप्रमाणे आज जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व गारपीट झाली. अजुनही दोन तीन दिवस पावसाचे वातावरण राहणार आहेत.
अशा परिस्थितीत शेती पिकाची नासाडी होत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, संत्रा, गहू,हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच घरांवरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडी उन्मळून पडली.
एकूणच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|