अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- आधीच करोनामुळे बेजार झालेल्या जनतेला आणि शेतकर्यांना आता अवकाळी आणि गारपिटीचा जबर फटका बसला आहे.
अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आणला असून काही ठिकाणी मळणी सुरू असल्याने शेतमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाचे झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यात वादळी वार्याने शेतात उभी असलेली व काढणीस आलेली गव्हाची पिके तसेच घास पिके भुईसपाट झाली. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व मका ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकासह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे.
तसेच संगमनेर, राहुरी, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांत झालेल्या जोरदार गारपिटीमुळे उभ्या पिकांसह कांदा, भाजीपाला, टरबूज, मोसंबी, आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले. कोबी, फ्लॉवर, कोथंबीर, टोमॅटो, वांगी अशा भाज्यांचा शेतात अक्षरशः चिखल झाला. पाथर्डी तालुक्यात डांगेवाडी परिसरातील सुमारे 25 किलो मीटरच्या रस्त्यावर गारांचा थर साचला होता.
दरम्यान, डोळ्यांदेखत पिकांचे होणारे नुकसान पाहून अनेक शेतकर्यांचे डोळे पाणावले होते. बारागाव नांदुरसह परिसरातील गावातील कांदा, गहू, ऊस, टरबूज, काकडीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने त्वरित नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
म्हैसगाव, ताहाराबाद, मल्हारवाडी, घोरपडवाडी, कुरणवाडी, चिंचाळे, दरडगाव, वावरथ, जांभळी परिसरातील काढणीसाठी आलेले कांदा पिक भुईसपाट झाले. वार्यामुळे गहु जमिनदोस्त झाला. काही ठिकाणी टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुमारे एक तास या वार्याने धुमाकूळ घातला.
काढणीस आलेला गहू, कांदा, ऊसासारखी पिके जमिनदोस्त झाली. काढलेला कांदा व गहू या अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने विज पुरवठा खंडीत झाला.
निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण शेती पिकांचे मोठे नुकसान केले. शेतकर्यांचे लाखो रुपये वाया गेले. नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|