आपल्या आरोग्य संस्कृतीचा सर्वांनी स्विकार करावा -महापौर बाबासाहेब वाकळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  सध्याच्या कोरोनाच्या व स्पर्धेच्या युगात अनेक लोकांमध्ये मानसिक ताणतणाव आणि शारीरिक रोग वाढत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांनी नियमित योगसने करावीत. यामुळे अनेक व्याधी विना औषध दूर होऊ शकतात.

अनेक आजारांवर प्राणायम, योगाने मात करता येते. शासनाच्यावतीने योग सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जागतिक स्तरावर योगाचे महत्व मान्य केले असल्याने ही आपल्या आरोग्य संस्कृतीचा सर्वांनी स्विकार करावा, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

योग विद्या धाम, अहमदनगर या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ‘योग शिक्षक पदविका’ प्रमाणपत्र वितरण महापौर वाकळे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले; याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी योग विद्या धामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, प्राचार्य माणिक अडाणे आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, योग विद्या धाम ही संस्था अहमदनगर जिल्ह्यात योगाचा प्रचार, प्रसार व योग शिक्षणाचे महत्वाचे काम अविरत गेली 36 वर्षापासून करीत आहे ही गोष्ट उल्लेखनिय आहे. संस्थेचे कार्य अधिक व्यापक व्हावे, यासाठी आपण सर्वोतोपरि मदत करु, असे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी दत्ता दिकोंडा म्हणाले, योग विद्या धामच्यावतीने शहरातील विविध भागात नागरिकांच्या सोयीसाठी वर्ग चालविले जात आहेत. त्याचबरोबर एखाद्या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार विशेष वर्गही घेतले जातात. योगाचे महत्व नागरिकांना पटत असून, त्यामुळे अनेक लोक योगकडे वळत आहेत.

त्यामुळे योगाचे योग्य व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी चांगले योग शिक्षक निर्माण व्हावे, यासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ‘योग शिक्षिका पदविका’ कोर्स सुरु असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

सौ. अर्चना कुलकर्णी, सौ. प्रिती बोरूडे, डॉ. पल्लवी राऊत, शेखर पाटकर या नवीन योग शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपमाला लांडे व वैशाली पांढरे यांनी केले. तर योग विद्या धामच्या सचिव सौ. अंजली कुलकर्णी यांनी आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe