मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. त्यामुळे शरद पवारांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांना कोपरखळी मारली आहे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो, असे गडकरी म्हणाले.
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली. पवारांनी या निवडणुकीत एकहाती केलेला प्रचार पक्षाच्या कामी आला.

सर्वात जास्त गाजली ती त्यांची साताऱ्यातील सभा. पवारांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीने तब्बल ५४ जागा जिंकून सत्ताधारी भाजपा-शिवसेनेला धक्का दिला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या १३ जागा वाढल्या, तर भाजपा-शिवसेनेच्या मिळून एकूण २४ जागा घटल्या.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना कोपरखळी मारली. झाले असे की शुक्रवारी सायंकाळी पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले येथे एका कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमात खुल्या व्यासपीठावर गडकरींची मुलाखत घेतली जात होती. त्याच दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला.
कार्यकर्ते तातडीने गडकरी आणि मुलाखतकाराच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहिले. मात्र भर पावसात गडकरींनी मुलाखत सुरूच ठेवली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करताना ‘पावसात भिजल्याचा राजकीय लाभ होतो, असे ऐकले आहे, असे गडकरी म्हणाले.
याला पवारांच्या साताऱ्याच्या त्या सभेचा संदर्भ होता. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. गडकरी स्वत:ही आपल्या या विनोदावर खळखळून हसले.
- मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या सीट्स वाढल्यात, रेल्वेने 4 एसी चेअरकार कोच बसवलेत
- विद्यार्थ्यांनो, 13 मे ला 10वी चा निकाल लागणार, ‘या’ तारखेपासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार !
- 8वा वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्रातील 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !
- पुणे अन सोलापूर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज, ‘या’ बसस्थानकातून सुरु होणार अक्कलकोट बससेवा ! कस असणार वेळापत्रक ?
- ‘या’ अक्षरांची नावं असलेली लोकं असतात प्रचंड दृढनिश्चयी, आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करतात