मुंबई : शिवसेनेला १७० आमदारांचे पाठबळ असून ही संख्या १७५ वर देखील जाऊ शकते, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वास व्यक्त करताना सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्तास्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळाला आहे. मात्र सत्ता वाटपाचे सूत्र निश्चित होत नसल्याने दहा दिवस झाले तरी सत्तेचा रथ रुतून बसलेला आहे. आता सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगवान होऊ लागल्या आहेत.
रविवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा आपली भूमिका विषद केली. शिवसेनेकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत.
दोन राज्यपाल पदे, केंद्रात दोन मंत्रीपदे दिल्यास सेना भाजपाबरोबर जाईल का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ‘ये फॉर्म्युला किसने दिया? शिवसेना बाजारमें बैठी है क्या?’ असा सवाल करत मुख्मंत्रीपद दिले तरच तोडगा निघू शकतो, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.