अमरावती : शेतीच्या वादातून वहिनीला मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आईला वाचवायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाला काका-काकूने विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमगाव येथे २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी २ नोव्हेंबर रोजी रात्री आरोपी काका-काकूविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. गौतम शिवदास मेश्राम व संगीता गौतम मेश्राम रा.कळमगाव अशी गुन्हे दाखल झालेल्या काका-काकूचे नाव आहे
गौतमचा शेतीच्या कारणावरून मोठ्या भावासोबत वाद सुरू आहे. याच वादातून गौतम व त्याची पत्नी संगीता यांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री मोठ्या भावाच्या घरी जावून वहिनीला मारहाण केली. त्यांना विष पाजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलगा रितीक भीमराव मेश्राम (१३) हा आईला वाचवायला गेला.
त्याने काका गौतम यांना धक्का दिला. त्यामुळे काका गौतम याने पत्नी संगीताच्या मदतीने रितीकला विष पाजण्याचा प्रयत्न केला. त्यात विषारी द्रव्य रितीकच्या तोंडात पडले. त्यामुळे लगेच त्याची प्रकृती बिघडली. रात्रीच आईने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू आहेत.