अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्म उपाययोजनांची आता कडक अंमलबजावणी केली जात असून, त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.
असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अहमदनगर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यात कोरोना सध्याची परिस्थिती व त्यावर प्रशासन कोणत्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्हयात कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी होत असलेल्या ठिकाणी तसेच प्रतिबंध केलेल्या ठिकाणी आता जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.
जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करत असलेल्या नागरिकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीही आता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्याच्या काही भागात रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याठिकाणी केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
याशिवाय, यापुढे बाधित रुग्णांना आता घरीच अलगिकरण करण्याऐवजी त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व यंत्रणांना कोविड केअर सेंटर आवश्यक त्या सुविधांनी परिपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
जिल्ह्यात रात्री १० वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आता त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून तशा सूचना पोलिस, मनपा, परिवहन विभाग,
सर्व तहसिलदार यांना देण्यात आल्या आहेत. बाहेर गावाहून आलेले किंवा लग्न समारंभ किंवा इतर सोहळ्यात सहभागी होऊन नंतर कोरोना बाधित झालेल्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. याशिवाय आठवडी बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते.
त्यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|