अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-आमदार नीलेश लंके यांनी रुग्णालयात उपचार सुर असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली.
त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे” असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे.
गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आ. लंके यांनी सुरूवातीस नागरीकांना प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर विविध शासकिय अधिकाऱ्यांकडून कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेत राज्य पातळीवरून मतदारसंघासाठी काही मदत आवश्यक आहे का याचीही त्यांनी चाचपणी केली.
रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन सरकारी तसेच खाजगी रूग्णालयात कोरोना बाधित उपचार घेऊ लागले असून आ. लंके यांनी सुपे येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची शुक्रवारी रात्री भेट घेतली.
मात्र अशाच रूग्णांना दिलासा देण्यासाठी आ. लंके यांनी या रूग्णांची भेट घेत, त्यांच्यासमवेत सेल्फी काढीत, त्यांना एखादे फळ खाण्याचा आग्रह धरीत दिलासा देण्याचे काम केले आहे.
काही ठिकाणी रुग्णांनी त्यांचे सेल्फी घेतले तर काही ठिकाणी स्वत: लंके यांनीही रुग्णांसोबत सेल्फी घेतले. सोशल मिडीयावर हे फोटोज चांगलेच व्हायरल होत आहे. लंके यांच्या या भेटीमुळे उपचार घेत असलेले रुग्ण सुखावल्याचे सांगण्यात आले.
नीलेश लंके यांचा करोना रुग्णासोबत सेल्फी करोना बाधितांच्या जवळ जाण्यास त्यांच्या नातेवाईकांनाही मनाई आहे. अशा परिस्थितीत आमदारांनी थेट जवळ जाऊन भेट घेतली. तेही पीपीई कीट आणि साधा मास्कही न लावता.
लंके यांच्या या ‘धाडसाचे’ त्यांच्या समर्थकांकडूनही कौतुक होत आहे. मात्र, आरोग्य आणि सरकारी नियमांच्या विरोधात त्यांची ही कृती असल्याचे दिसून येते. भेट घेऊन दिलासा द्यायचा असेल तर सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेऊन जाता आले असते,
अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना, अन्य नियम मोडणाऱ्यांना दंड केला जात आहे, अशा परिस्थितीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधीसंबंधी प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|