अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील मढी येथील गोपाळ समाजाची मानाची होळी मानपानाच्या किरकोळ कारणावरून ताणतणावातच पोलिस बंदोबस्तत पेटली.
कोरोच्या पार्श्वभूमीवर शासनाने मढी यात्रेला बंदी घातल्याने फक्त गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यांना होळीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता.
रविवारी सायंकाळी पाच वाजता गोपाळ बांधव कडेकोट पोलिस बंदोबस्तात मानाच्या गोवऱ्या घेण्यासाठी कानिफनाथ गडावर आले.
यावेळी देवस्थान समितीने समाजाच्या मानकऱ्यांना मानाच्या गोवऱ्या दिल्या. नंतर पोलिस बंदोबस्तात नाथांचा जयजयकार करत पूर्व नियोजित जागेवर वाजत गाजत गोवऱ्या पोहोचल्या.
तेथे मानकरी गोलाकार बसले पूजा विधी झाल्यावर पाच वाजता होळी पेटली. चैतन्य कानिफनाथांच्या गडाच्या बांधकामाला कष्टाची कामे अत्यंत सेवाभावी पद्धतीने गोपाळ समाजाने केल्याने नाथांनी स्वत: होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला दिला.
या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत. होळीचा सण सार्वजनिकरीत्या साजरा न करणारे मढी गाव राज्यात एकमेव ठरले आहे. समाजातील वादामुळे मागील वर्षी दोन होळ्या पेटवल्या होत्या.
नव्या जागेवर होळी पेटवून द्यावी असा आग्रह मानकऱ्यांनी धरल्याने प्रशासन व गोपाळ बांधवांमध्ये काही काळ तणाव वाढला. पारंपारिक जागेवर होळी पेटवण्यास प्रशासन ठाम राहिले. त्यामुळे जुन्या जागेवर होळी पेटली.
यात्रेचा दुसरा टप्पा रंगपंचमीचा असून चतुर्थी पंचमी षष्ठीला मंदिर बंद राहून गावात जमावबंदी आदेश राहणार आहे. बाहेरच्या कुणीही भाविक व व्यावसायिकाने यात्रेसाठी मढीला येऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|