अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आई, वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जीत चार पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री करणार्या चुलते व इतर नातेवाईक असलेल्या राजकोटवाला परिवारातील सहा सदस्यांवर जिल्हा न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलीस स्टेशनला रविवारी (दि.28 मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अक्सा अन्वर राजकोटवाला (वय 22 वर्षे, रा. अहमदनगर) या मुलीच्या फिर्यादीवरुन हबीब इस्माईल राजकोटवाला, रेहान हबीब राजकोटवाला, सलीम फारुक राजकोटवाला, आमीन फारुख राजकोटवाला (सर्व रा. अहमदनगर), साईरा हबीब राजकोटवाला व आरिफ इक्बाल राजकोटवाला (दोन्ही रा. कॅम्प पुणे) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
राजकोटवाला परिवार हे नगरमधील ड्रायफ्रुटचे प्रसिध्द व्यापारी आहेत. अक्सा राजकोटवाला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, काही वर्षा पूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोन ते तीन वर्षातच आजारपणामुळे आईचाही मृत्यू झाला. मी व माझ्या तीन बहिणी गंजबजार येथे टीन गल्लीत एकट्या राहत होतो.
अल्पवयीन असल्याने माझ्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनी संदर्भात आंम्हाला माहिती नव्हती. याचाच फायदा उचलत आमचे चुलते हबीब इस्माईल राजकोटवाला याने आपल्या कुटुंबातील इतर पाच जणांना सोबत संगणमत करून अन्वर राजकोटवाला यांच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीवर आमच्या बहिणींचे नाव लागू न देता आमची दिशाभूल केली.
प्रॉपर्टी हक्क सोड पत्रावर आमच्या सह्या घेऊन आमच्या वाट्याला येणारी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. तसेच दुसर्या प्रॉपर्टीची परस्पर विक्री करून माझी बहिण आफरीन व आफशा राजकोटवाला हिच्या नावाने बँकेत अकाऊंट उघडून आमची दिशाभूल करत कोर्या चेकवर सह्या घेतल्या. तर दुसरी प्रॉपर्टी 1 कोटी 85 लाख रुपयात विकली.
त्या जागेचे पैसे आफरीन व आफशा हिच्या खात्यात जमा झाले असता, कोर्या चेकवर घेतलेल्या सह्याद्वारे सदरची रक्कम बँकेतून आरोपींनी परस्पर काढून घेतली. वडिलांच्या नावावर असलेली जमीन हबीब राजकोटवाला व इतर सदस्यांनी स्वतःच्या नावावर करून घेत फसवणूक केली.
आई, वडिलांच्या मृत्यूनंतर राहत असलेल्या टीन गल्ली येथील घरातून सदर आरोपींनी आंम्ही चारही बहिणींना हुसकावून लावले. राहते घरही स्वत:च्या ताब्यात घेतले. सन 2009 पासून ते आजपर्यंत हबीब राजकोटवाला व त्याच्यासह इतर आरोपींनी आंम्ही चारही बहिणींना वारंवार मानसिक त्रास दिला असून, अनेक वेळा बेदम मारहाणही केली आहे. सायरा हबीब राजकोटवाला हिने अक्साला मारहाण करत
तिच्या चेहर्यावर गरम पाणी टाकल्याने आजही तिच्या चेहर्यावर जळाल्याचे डाग स्पष्ट दिसून येत आहे. मागील अनेक वर्षापासून या निराधार बहिणी न्याय मागत होत्या. शेवटी अक्सा राजकोटवाला हिने थेट अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या
आदेशावरून कोतवाली पोलीस ठाण्यात राजकोट परिवारातील सहा जणांविरुद्ध सी.आर.पी. सी.च्या कलम 156/3 अंतर्गत अर्ज कलम 120 बी 406, 420, (463, 464, 465) च्या अंतर्गत 471 ,474, 324, 504, 506 आर/डब्ल्यू 34 आय.पी.सी. नुसार 2010 पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|