अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील विरगाव येथे सणासुदीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्याच्या कडेला असणार्या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.
ही घटना सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आश्वीनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
वीरगाव येथे अश्विनी कृष्णांगर थोरात (वय १६) ही मुलगी अभ्यास करण्यासाठी शेतात गेली होती. तेथे झाडाखाली बसून ती अभ्यास करीत होती. उष्णतेचा त्रास होत असल्याने ती तळ्याकडे गेली असावी.
शेततळ्यातून तिचा आवाज येऊ लागल्याने शेतात काम करणाऱ्या तिच्या आई-वडिलांनी तिकडे धाव घेतली. वडिल कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय ४५) यांनाही चांगले पोहता येत नव्हते. तरीही मुलगी तळ्यात पडल्याचे पाहून त्यांनीही तळ्यात उडी घेतली.
मुलीने पित्याच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघेही बुडू लागले. काठावरून हे पहात असल्याने मुलीच्या आईने आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळचे लोक मदतीला धावले. मात्र, त्यातील अनेकांना पोहता येत नव्हते.
आणखी काही लोकांना बोलविण्यात आले. त्यांना तळ्यातून बाहेर काढण्यासाठी दोरखंड आणि अन्य साहित्याची जमवाजमव करण्यात आली. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. लोकांनी तळ्यात उतरून दोघांनाही बाहेर काढले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता.
हा प्रकार घडल्यानंतर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास या दोघांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणला होता. ऐन सनासुदीच्या दिवशी असा दु:खद प्रसंग घडल्यामुळे या पंचक्रोशीत शोककळा पसरली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|