अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वैयक्तिक कारणावरून शेवगाव तहसील कार्यालयात एकमेकांशी वाद करुन गोंधळ घालणा-या व शासकीय कामकाजात अडथळा आणणा-या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायब तहसीलदार विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव या पिता पुत्रासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तहसील कार्यालयात वादावादीत करत गोंधळ घालणा-या दोन गटातील वादातून मिनाक्षी भाऊसाहेब कळकुंबे (रा.आव्हाणे खुर्द) यांच्या फिर्यादीवरुन बलदवा पिता पुत्रावर जातीवाचक शिवीगाळ, छेडछाडीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान तहसील कार्यालयातील या गडबड गोंधळ व हाणामारीच्या प्रकारामुळे महसुल कर्मचा-यांनी कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करत निषेध व्यक्त केला. नायब तहसीलदार जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
आज मंगळवारी सकाळी १२ च्या सुमारास कार्यालयातील कर्मचा-यांसह मार्चएंडचे महत्वाचे हिशोबी कामकाज करत होतो. त्यावेळी तहसीलदार दालनाच्या बाहेर गोंधळाचा व आरडाओरडा ऐकू आला.
त्यामुळे बाहेर येवून पाहीले असता तेथे विशाल बलदवा व त्याचे वडील विजयकुमार बलदवा यांच्यात व इतर सात आठ जणांमध्ये मारामारी चालू होती. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता कोणी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
नंतर सदर जमाव नायब तहसीलदार यांच्या दालनासमोर आल्याने त्यांच्यातील गोंधळामुळे आम्हाला शासकीय कामकाज करणे अवघड बनले. या आवाजामुळे तहसीलदार अर्चना पागिरे – भाकड तेथे आल्या व त्यांनी तुमच्यातील वाद कार्यालयाच्या बाहेर करा येथे गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा आणू नका.
मात्र तरीही बलदवा यांनी आरेरावीची व उध्दट भाषा वापरत तहसीलदार पागिरे यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे कार्यालयातील वाळू लिलाव व इतर कामकाजात अडथळा आला. या कारणास्तव बलदवा पिता पुत्रासह सह सात ते आठ अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|