लसीकरण मोहीम युद्धपातळीवर; जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख लोकांचे लसीकरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने नगर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.

दरम्यान कालपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आधी 107 केंद्रांवर लस दिली जात होती. 1 एप्रिलपासून त्यात वाढ करून आता लसीकरण केंद्रांची संख्या 165 करण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा रुग्णालय 1, उपजिल्हा रुग्णालय 2, ग्रामीण रुग्णालय 23, प्राथमिक आरोग्य केंद्र 96 महापालिका 9, कॅन्टोन्मेंट 1, खासगी दवाखाने 33 असे एकूण 165 केंद्र नगर जिल्ह्यासह देशभरात 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.

सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी, तसेच फ्रन्टलाइन वर्कर यांनाच लस दिली जात होती. त्यावेळी जिल्ह्यात केवळ 15 ते 20 लसीकरण केंद्र होते. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक, तसेच व्याधिग्रस्त 45 वर्षांवरील नागरिक यांना लस देण्याचा निर्णय झाला.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. 31 मार्च रोजी 54 हजार 700 डोस जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून ते तात्काळ संबंधित केंद्राला पोहोच करण्यात आले आहेत.

सध्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका तसेच खासगी 33 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र आहेत.

त्यातून आतापर्यंत 2 लाख 1 हजार 588 लोकांना लस दिली आहे. त्यामध्ये दीड लाख डोस ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लोकांना दिले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe