दशकपूर्ती ऐतिहासिक विजयाची : धोनीच्या षटकारानंतर संपूर्ण देशभरात साजरी झाली दिवाळी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-49 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कुलसेखराला षटकार मारत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

धोनीच्या त्या षकारानंतर त्या रात्री संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली.भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2 एप्रिल हा दिवस खास आहे. आजच्या दिवशी म्हणजे दहा वर्षांपूर्वी 2011 मध्ये भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता.

कपिल देवच्या टीमनं 1983 साली केलेल्या कामगिरीनंतर तब्बल 28 वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने षटकार लगावत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

धोनीचा तो अजरामर षटकार, त्यानंतर मिरवणुकी दरम्यान सचिन तेंडुलकरचे अश्रू आणि संपूर्ण देशानं केलेला जल्लोष आज 10 वर्षांनी देखील सर्वांच्या लक्षात आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या 2011 च्या वर्ल्ड कपच्या दोन यजमान टीममध्ये वर्ल्ड कपची फायनल झाली होती.

या मॅचची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा याने टॉस जिंकला. संगकराने टॉस जिंकताच पहिल्यांदा बॅटींग घेतली. झहीर खानच्या स्पेलनं श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. त्यांचे दोन्ही ओपनर 10 षटकात बाद झाले.

त्यानंतर कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी श्रीलंकेची इनिंग सावरली. संगकारा बाद झाला. पण जयवर्धने खेळत होता. श्रीलंकेच्या अनुभवी बॅट्समननं त्याचं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं. शेवटच्या षटकांत त्याने वेग वाढवला आणि शतक झळकावले.

जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 275 धावांचं आव्हान ठेवलं. वर्ल्ड कप फायनलचा विचार करता 275 हे आव्हानात्मक लक्ष्य होते. भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग शून्यावर, त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर 18 धावांवर बाद झाला.

सचिन बाद होताच वानखेडे स्टेडियमवर नाही तर फायनल मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या घरात काही काळ शांतता पसरली होती. या परिस्थितीत गौतम गंभीर आणि विराट कोहली ही दिल्लीकर जोडी जमली. या दोघांनी धावफलक हलता ठेवला.

अखेर दिलशाननं एक सुंदर झेल घेत कोहलीला बाद केलं. विराट कोहली बाद झाल्यानंतर बॅटींग ऑर्डर प्रमाणे युवराज सिंह येणे अपेक्षित होते. युवराज संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात होता. पण महेंद्रसिंह धोनीनं स्वत:ला बढती देण्याचा निर्णय घेतला.

धोनीची ती चाल यशस्वी झाली. महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम खेळ त्या दिवशी केला. गौतम गंभीरचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं. पण धोनी थांबला नाही. तो सहज पद्धतीनं खेळत होता. त्यानं श्रीलंकेच्या सर्व बॉलर्सचा समाचार घेतला.

युवराज सिंहसोबत वेगाने रन जमवले. त्यानंतर अखेर तो क्षण आला…49 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीनं कुलसेखराला षटकार मारत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. धोनीच्या त्या षकारानंतर त्या रात्री संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe