शेवगाव :- अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान १०० टक्के असून, शेतीचे पंचनामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेवारीचा खेळ न करता सरसकट पंचनामे करून शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, या जाणिवेतून काम करावे, अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे यांनी दिल्या.
खा. विखे यांनी आज मुंगी, हातगाव व गदेवाडी या गावांत समक्ष भेटी देऊन शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शेवगाव तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार डॉ.विनोद भामरे,तालुका कृषी अधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जि. प. सदस्य राहुल राजळे,नगरसेवक अरुण मुंडे, सागर फडके, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, चंद्रकांत गरड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
खा. डॉ. विखे म्हणाले- अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे. पावसामुळे आतापर्यंत फक्त ६४७० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झालेले असून, पावसाने उघडीप दिल्यास १० तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करून संबधित शेतकऱ्याचे नाव, त्याच्या झालेल्या नुकसानीची टक्केवारी, बाधित क्षेत्र याची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यात ज्या शेतकऱ्याचे नाव नाही किंवा इतर बाबतीत तफावत आढळल्यास संबधिताने पुढील तीन दिवसांत संबधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी व त्यानंतर तालुक्याच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल शासकीय पातळीवर सादर करावा.