पारनेर : अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांवर बोट न ठेवता सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.
शासनमान्य दुकाने, शिधापत्रिका व इतर सोयीसुविधांविषयी माहिती घेत सर्वसामान्य लोकांचे हेलपाटे कमी करावेत, अशीही मागणी लंके यांनी या वेळी केली. पारनेनर तहसील कार्यालयात आयोज़ित बैठकीत आ. लंके बोलत होते.
पावसाने तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा ज़ास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू असल्याचे नायब तहसीलदार एल. एस.रोहकले यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रभारी नायब तहसीलदार रमेश काथोटे, नायब तहसीलदार एस. एल. रोहकले, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी,
सभापती प्रशांत गायकवाड, संजीव भोर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बबलू रोहकले, सरपंच राहुल झावरे, सरपंच ठकाराम लंकेल सुरेश धुरपते, सचिन पठारे, सुदाम पवार, दादा शिंदे, विजय औटी, विक्रम कळमकर, दादासाहेब शिंदे, सुरेश धुरपते ,सभापती नंदकुमार औटी, जयसिंग मापारी, कारभारी पोटघन, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, संदीप ठाणगे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अधिकारी व पदाधिकारी ही रथाची दोन चाके असून,, तालुक्याचा विकास करायचा असेल तर एकत्रित राहून काम करावे लागेल. मतदारसंघात पन्नास वर्षात मोठे काम करायचे असून, याचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा ज़ास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, ३ हजार ५३१ हेक्टरील शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे काम चालू आहेत.
तर ४८५ हेक्टरवरील फळबागांचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी दिली. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने महसूल, कृषी व प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे समन्वयाने काम करावे, असे आवाहन आ. लंके यांनी या वेळी केले.
महसूल, कृषी, महावितरण, आरोग्य, पंचायत समिती, शिक्षण आदी विषयांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. पंचायत समितीने बोगस शेळीपालन व गाय-गोठा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आ.लंके यांनी दिले.
आदिवासी धनगर, ठाकर समाजाला शिधापत्रिकासह दाखले देणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याचा पहिल्या सोमवारी पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबारी घेण्याचा संकल्प आ. लंके यांनी व्यक्त केला आहे.