अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अकोले तालुका अतिशय दुर्गम असून येथे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महसूल, पोलीस, नगरपंचायत व आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिल्या.
अकोले तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अकोले पंचायत समितीत आढावा बैठक घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार मुकेश कांबळे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरिक्षक अभय परमार,
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय घोगरे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे,
गटविकास अधिकारी डी. डी. सोनकुसळे, नोडल ऑफिसर डॉ. श्याम शेटे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखीळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी भोसले यांनी आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यात ९ हजार ३६८ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. अकोले तालुक्यात काल ३९ रुग्ण आढळले असून एकूण ३८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाच्या टेस्टचे रिपोर्ट उशिरा येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे अशा लोकांनी रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोतुळ, ब्राम्हणवाडा येथून येत असताना नागरिक कोरोनाच्या बाबतीत अजिबात गंभीर नसल्याचे जाणवले.
ही बाब घातक असल्याचे ते म्हणाले.अकोलेतील मंगल कार्यालयावर कारवाई केली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून कोविड केअर सेंटरची संख्या आठ हजारावरून १२ हजारावर नेली आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|