अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाच्या महामारीमुळे कामकाजावर वेळेची मर्यादा आली. याशिवाय विरोधकांनी सभागृहात केलेला गदारोळ यामुळे राज्यातील अनेक आमदारांना प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.
मात्र या अधिवेशनात नियोजीत प्रश्नांना मांडण्याची संधी मिळाली नाही म्हणून विषय सोडून न देता, या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे ध्येय आमदार रोहित पवार यांनी ठरवले आहे.
त्यासाठी काही मांडलेल्या आणि मांडता न आलेल्या नियोजीत प्रश्नांसाठी फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमावरच सभागृह करण्याची संकल्पना आमदार पवार यांनी सुरु केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आणि विरोधकांच्या गदारोळामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यासाठी पवार यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
आतापर्यंत रोहित पवार यांनी ई-कचरा गंभीर समस्या, जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या, प्रदूषण, फुलशेती धोरणाची गरज आणि शहरी बेरोजगारी या प्रश्नांवर आपल्या समाजमाध्यमांद्वारे भाष्य केले आहे.
प्रत्येक विषयाचे महत्त्व नागिरकांना आणि परिणामी यंत्रणांना कळावे, यासाठी त्या विषयाची पार्श्वभूमी आणि उपस्थित करण्यात आलेले मुद्दे पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार विस्तृतपणे सांगत आहेत. विधिमंडळात अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला.
काही प्रश्नांना लेखी उत्तरं मिळाली, मात्र वेळेअभावी सर्वच प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, परंतु जनहिताच्या दृष्टीने या प्रश्नांचा पाठपुरावा मी करत राहील. तुमच्या माहितीसाठी हे मुद्दे इथं शेअर करत आहे”, असं रोहित पवार ट्विटरवर म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|