नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकणाऱ्या माता-पित्याविरुद्ध अखेर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दाम्पत्याचा पत्ता पूर्ण नसल्यामुळे आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
मोहित भिकूलाल भंडारी (रा. रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला १९ ऑक्टोबर रोजी सिडको एन-९ परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. २१ रोजी मोहितच्या पत्नीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.
परंतु जन्मत:च दोन्ही मुली अशक्त असल्याने त्यांना निमाई हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मुलींच्या उपचारासाठी तसेच त्यांचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या मोहित भंडारी व त्यांच्या पत्नीने २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही नवजात मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकली होती.
तीन दिवस रुग्णालयाने मुलींचे वडील मोहित भिकूलाल भंडारी (रा. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून बिल भरण्यास सांगितले. मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर रुग्णालयाने सिडको पोलिसांना कळविले.
सिडको पोलिसांनी याबाबत बाल कल्याण समितीकडे आपला अहवाल पाठविला. समितीने दोन्ही मुलींना संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पोलीस या दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले असता डॉक्टरांनी १ लाख ७० हजार रुपये भरण्यास सांगत मुलींना ताब्यात देण्यास नकार दिला.
रुग्णालय मुलींचा ताबा घेऊ देत नाही तर आई-वडिलांशी संपर्क होत नसल्याने शेवटी सिडको पोलीस ठाण्याचे जमादार रमेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून माता-पित्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शिरसाट करीत आहेत.