अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-लसीकरणावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करीत नाही. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे.
ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहात, महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.
आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईलही अपेक्षा, अशी कोपरखळी आरोग्य मंत्री राजेश टाेपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्विट करून लगावली आहे.
महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करू नये, असे मंत्री जावडेकरांनी ट्विट केले होते. त्यास आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्तर दिले.
राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोना आढाव्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
महाराष्ट्र कोरोना विरुद्धच्या लढाईत कुठेही मागे नव्हता आणि नाही हे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये असे देशातील सर्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधानांनी आवाहन करावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढवण्यात येत आहेत असा विश्वास दिला.
तसेच लसीचा जादा पुरवठा करावा. इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|