अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत, मात्र निर्बंध असूनही काहीही फायदा होत नसून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होतच आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा :- कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती :- आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली आहे.
व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले :- सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे.त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात ;- सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे. गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|