अहमदनगरमध्ये काेरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मृतदेहांची अवहेलना झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने गुरुवारी रात्री शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून अमरधाममध्ये नेण्यात आले.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम अहमदनगरमध्ये सुरू आहे. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी ९ ऑगस्ट २०२० रोजी अशीच समस्या उद्भवली होती. मात्र त्यातून ना पालिकेने धडा घेतला ना जिल्हा प्रशासनाने. कोरोना बाधित रुग्णवाढीच्या बाबतीत नगर जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दीड हजारांवर रुग्ण सापडत आहेत. त्यात दोन वेळा दोन हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे दररोज सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी हा अाकडा ४८ वर गेल्याने यंत्रणा कोलमडून पडली.
अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून मृतदेह नेले जातात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही नगर ताटकळत बसावे लागते.
गुरवारी रात्री एकाच शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून अमरधाममध्ये नेण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासानाकडून आढावा बैठका घेतल्या जातात.
त्यामध्ये इतर गोष्टींवर चर्चा आणि नियोजन केले जात असले तरी करोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे तेथील कर्मचारी जमले तसे हे काम उरकताना दिसून येतात.
गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. शववाहिकेतून एकाचवेळी १२ मृतदेह नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी आणखी एक शववाहिनी घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, आतापर्यंत अशी व्यवस्था झालेली नाही. पूर्वी एकच विदयुत दाहिनी सुरू होती, आता दुसरी कार्यान्वित केल्याने तेवढा फरक मात्र पडला आहे.
घडलेला प्रकार हा अतिशय क्लेशदायक व धक्कादायक असून त्यामधून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर नीट उपचार होतात का नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|