अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे.
श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा दारातच मृत्यू झाला. मृतदेह दोन तास वाहनातच पडून होता.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेतच ठेवून ऑक्सिजन देण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र नगरमध्ये पहायला मिळत आहे.
‘दुष्मणावर देखील अशी वेळ येऊ नये’ अशी जी म्हण आहे तिचा आज या घटनेने प्रत्यय आला. आज श्रीरामपूर येथील एका रुग्णाची अशीच हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे.
रुग्ण गंभीर झाल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईक खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन आले.
मात्र, त्यावेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये फिरून पाहणी केली.
मात्र, कोठे बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला.
याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला.
तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन मात्र, या घटनेवर काहीही बोलायला तयार नाही.
नगर शहरातील जवळपास सर्व रुग्णालयांची क्षमता संपली आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ती व्यवस्था अपुरी आहे.
शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
त्यानुसार तीन हजार सातशे बेड उपलब्ध होणार असले तरी त्यातील आधीच बहुतांश बेड फुल आहेत. शिवाय त्यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्याही अपुरी आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|