अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-भिंगार शहरालगत वडारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या म्हस्के हॉस्पिटल येथे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात साठवून ठेवलेले रेमडेसिवीरचे १४ इंजेक्शन मिळाले आहेत.
याप्रकरणी डॉ. किशोर म्हस्केसह चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रोहित पवार, प्रशांत आल्हाट या दोघांना अटक केली आहे. डॉक्टर दाम्पत्य डॉ. किशोर म्हस्के आणि डॉ.कौशल्या म्हस्के हे पसार झाले आहे.
या हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा येथे काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. येथे रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री होत होती, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
म्हस्के हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरच्या परवान्याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून झाली. म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्यादराने विक्री होत
असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. हॉस्पिटलमधील मेडिकलचे १४ हजार रुपयांचे बिल त्यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी रात्री साडेदहा वाजता फौजफाट्यासह म्हस्के हॉस्पिटल येथे छापा घातला.
या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू आहे. त्यासाठी आयसीयू असल्याचे रुग्णांना सांगितले जात होते. परंतु तेथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याचे पाहणीत समोर आले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये येथे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा मोठा आहे.
तशा तक्रारीही प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यातून या कोविड सेंटर विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हे ६५ बेडचे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वीच तीन मजली बांधण्यात आलेले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|