महाराष्ट्रात लॉकडाऊन अन् पॅकेजची जोरदार तयारी ! १५ एप्रिलपासून लॉकडाउन लागणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याचा विचार करत आहे.

अशा परिस्थितीत लॉकडाउनबाबत समिश्र मते ऐकायला मिळत असून विरोधी पक्षाने लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे.

मात्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या.

१५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली.

त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल याची व्यवस्था करणे, रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाउन केल्याने शेकडो मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण तयारीनिशी हे लॉकडाउन जाहीर करण्याचे नियोजन केले आहे.

यासाठीच्या सर्व मार्गदर्शन सूचना आणि अंमलबजावणीची यंत्रणा याबाबत सखोल चर्चा करून शासन आदेशाचीही तयारी झाली आहे.

त्याशिवाय दारिद्र्यरेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो दरावर तांदूळ देण्याची नोव्हेंबरपासून बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार आहे.

१० लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना त्यांच्या बँक खात्यात तत्काळ प्रत्येकी पाच हजार रुपये टाकण्याचाही विचार सुरू आहे.

वित्त विभागाने तयार केलेले पॅकेज अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात विमान, रेल्वे, बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत असेल. सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यावर कठोर निर्बंध राहणार असून केवळ अत्यावश्यक प्रवासाचीच मुभा राहील, असे सांगण्यात येते.

राज्यातील गरीब व मजूर कामगारांसाठी काही प्रमाणात मदतीचे पॅकेज देण्यासाठी आज दिवसभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली. आज गुढीपाडवा आणि उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.

त्यामुळे सरकारने १४ एप्रिलच्या मध्यरात्री पासूनच लॉकडाउन करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी लॉकडाउनची मानसिकता तयार करावी, अशा प्रकारचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती पुन्हा पंतप्रधानांना करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितलं आहे.

लसीकरणात पुढे असलो तरी आणखी गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला काही काळासाठी का होईना, कडक निर्बंध लावावेच लागतील, असे सूतोवाच ठाकरे यांनी केले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe