हंगा तलाव ओव्हरफ्लो, पारनेरची तहान भागली !

Ahmednagarlive24
Published:

पारनेर
पारनेर शहर, तसेच हंगा, लोणी हवेली या गावांची तहान भागवणारा हंगा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी पहाटे चार वाजता तो ओव्हरफ्लो झाल्याची माहिती शाखा अभियंता अजिनाथ मोहळकर यांनी दिली. गेल्या दुष्काळात ७० हजार घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने यंदा पाणीसाठ्यात सुमारे ४ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे.

१९८५ मध्ये बांधून पूर्ण झालेल्या या तलावाची पाणी साठवण क्षमता ६६.६७ दशलक्ष घनफूट असून २२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. या प्रकल्पावरून पारनेर शहर, हंगा, तसेच लोणी हवेली गावांच्या पाणी योजना कार्यान्वित असून तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने येत्या दोन वर्षांत शहरासह दोन्ही गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

मागील दुष्काळात भारतीय जैन संघटनेने ४० हजार घनमीटर गाळाचा उपसा केला असून शेतकऱ्यांनीही ३० हजार घनमीटर गाळ वाहून नेल्याने तलावाची साठवण क्षमता ४ दशलक्ष घनफुटांनी वाढली आहे. 

मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने हंगा तलाव भरणार की नाही याची चिंता शहरासह हंगा, तसेच लोणी हवेलीच्या ग्रामस्थांना लागली होती. त्यातच या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्याने अनेक ठिकाणी पाणी अडवले गेले. 

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विविध बंधारे, तलाव ओसंडून वाहू लागले. हंगा तलावही अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी पहाटे ओसंडून वाहू लागला. 

तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने आता पारनेर शहरास सुपे औद्योगिक वसाहतीमधून पाणी विकत घ्यावे लागणार नाही. नगरपंचायतीची मोठी बचत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment