अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला शिवारात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक दोघा युवकांवर हल्ला केला.
बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही युवक जखमी झाले. बिबट्याने नान्नजदुमाला परिसरात भरदिवसा चांगलाच धुमाकूळ घातला.
त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला शिवारातील चत्तर वस्ती व पाटोळे वस्ती परिसरात काही रहिवाशांना गुरुवारी दुपारी बिबट्या दिसला.
परिसरात बिबट्या आला असल्याची माहिती सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी उपसरपंच सोमनाथ चत्तर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने गोळा होत शेताकडे गेले होते.
त्यामध्ये ऋषीकेश रावसाहेब पाटोळे (वय २२) व ओंकार विलास पाटोळे (वय १७) या युवकांचा समावेश होता.
मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऋषीकेश पाटोळे व ओंकार पाटोळे या दोघा युवकांवर हल्ला केला. ऋषिकेश पाटोळे या युवकाच्या तोंडाला, डाव्या हाताला व खांद्याला बिबट्याने पंजा मारीत व चावा घेत जखमी केले.
ओंकार पाटोळे या युवकाच्या डाव्या हाताच्या हाताला बिबट्याने चावा घेतला व पाठीवर पंजाने मारून जखमी केले. सदर जखमी युवकांवर तळेगाव दिघे येथील सरस्वती खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
नान्नजदुमाला शिवारात बिबट्याने दोघा युवकांवर हल्ला करीत जखमी केल्याच्या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी उपसरपंच सोमनाथ चत्तर सहित रहिवाशांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|