चेन्नई : सत्तारूढ भाजप माझे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप तामिळी सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी केला आहे.
भाजपच्या जाळ्यात मी अडकणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले. ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांनी चेन्नई येथे राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या नव्या कार्यालयात दिवंगत दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.
त्यानंतर रजनीकांत म्हणाले की, काही लोक आणि मीडिया मला भाजप समर्थक ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तामिळी कवी तिरुवल्लुवर यांचेही भगवेकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मी आणि तिरुवल्लुवर दोघेही भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही.
आम्ही भाजपच्या प्रयत्नांना अजिबात बळी पडणार नाही. आपण पाठिंबा दिला तर प्रत्येक पक्ष आनंदी होईल. मात्र, सर्व काही माझ्या निर्णयावर अवलंबून आहे, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब अशी की, अलीकडच्या काळात रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते.
तेव्हापासून रजनीकांत हे भाजपचे खंदे समर्थक बनल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, भाजपने मात्र रजनीकांत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. दुसरीकडे, द्रमुकनेसुद्धा रजनीकांत यांच्या भूमिकेपासून हात झटकले आहेत.