अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला असताना, दररोज मोठ्या संख्येने कोरोनारुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे.
शहरात दररोज कोरोनाने मृत झालेल्यांच्या मृतदेहांचे खच पडत आहेत. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत असताना दररोज ४५ पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहेत.
विद्युतदाहिनीची क्षमता २० मृतदेहांची असताना उर्वरित मृतदेहांची ओट्यावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये केडगाव अमरधामच्या धर्तीवर नागापूर येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सूचनेनूसार कोरोनाने मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील अमरधाममध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतानाचे विदारक व मन हेलावणारे चित्र पहावयास मिळाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करूनदेखील उर्वरित मृतदेह प्रतीक्षेत आहेत.
शहरातील अमरधामचा भार हलका करण्यासाठी व मृतदेहावर वेळेत अंत्यविधी होण्यासाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
शहरातील अमरधाममध्ये प्रतीक्षेत न राहता नागापूरला अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आली असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|