ऐकावे ते नवलच… रुग्णवाहिकेतून सुरु होती दारूची वाहतूक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सदैव तत्पर राहत असलेली रुग्णवाहिका आपण नेहमीच पाहत असतो. तिचा वेग, सायरन ऐकू आला कि कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी तिची धडपड सुरु असल्याचे समजते.

मात्र जिल्ह्यात एक असंवेदनशील प्रकार घडलेला उघडकीस आला आहे. चक्क रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले असून जवळपास पाच खोके देशी बनावटीच्या दारुसह 2 लाख 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेरमधील बसस्थानकाजवळील तपासणी नाक्यावर पोलिसांकडून नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरु होती. अशातच नाशिककडील रस्त्याच्या बाजूने भरधाव वेगाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली.

रुग्णवाहिकेवर संशय आल्याने पो.नि.देशमुख यांनी रुग्णवाहिकेला थांबविण्यास सांगितले. त्यांनी रुग्णवाहिका तपासली असता आतमध्ये कोणीही रुग्ण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अधिक तपासणी केली असता वाहनात ज्या ठिकाणी रुग्ण ठेवला जातो त्या संपूर्ण भागात पाच खोके देशी दारु पोलिसांना आढळली.

याबाबत त्याच्यासह वाहनात बसलेल्या त्या जोडीदाराकडे चौकशी केली असता ते उडवाउडवी करु लागल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी सदरच्या रुग्णवाहिकेतून तब्बल 23 हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची दारु जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक विजय खंडू फड (वय 42, रा.साईदर्शन कॉलनी,

मालदाड रोड) व त्याचा साथीदार कैलास छबुराव नागरे (वय 49, रा.शेडगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe