भाजपा नेते मृतदेहावर उभे राहून सत्ता मिळवण्याचा मार्ग सापडतोय का? याच्या शोधात : पटोले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत, केंद्र सरकारचा गलथानपणा आणि अपयशावर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत.

राज्यातील भाजपाचे नेते तर या संकटकाळात लोकांच्या मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजपशासीत राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या.

पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजपा नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐकले असते तर आज देशाचे स्मशान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी नक्कीच झाली नसती.

देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा, औषधी, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजपा नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मुंबई पोलिसांनी तो उधळून लावला, असे देखील पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाने १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करताना चलाखी करत लस पुरवठ्याची आपली जबाबदारी झटकून ती राज्य सरकारांवर ढकलली.

केंद्राच्या या घोषणेनंतर लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने लसीचे नवीन दर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष करोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत.

त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे? याचे उत्तर द्यावे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe