अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- दरेवाडी येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोने दरेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. दोन दिवसांपासून येथील कचरा डेपो पेटला असून त्याच्या धुराने परिसरातील लोक गुदमरत आहेत.
वारंवार मागणी करूनही कॅन्टोन्मेंट मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दरेवाडी येथे अनेक वर्षांपासून कॅंटोनमेंट बोर्डाचा (छावणी परिषद) मोठा कचरा डेपो आहे. भिंगारसह छावणी परिषद परिसरातील सर्व कचरा दररोज येथे आणून टाकला जातो.
शेकडो टन हा कचरा येथील खुल्या मैदानात कोणतीही प्रक्रिया न करता अस्तावस्त खाली केला जातो. वार्यामुळे हा कचरा परिसरातील लोकांच्या घरात घुसतो. अनेकदा कचरा भेटण्याच्या घटनाही घडतात.
गेल्या दोन दिवसांपासून येथील कचरा पेटला असून रात्रंदिवस परिसरातील लोकांच्या घरात धुराचे लोट जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरात रुग्ण आहेत, लहान मुले आहेत. त्यांना या धुरामुळे श्वास घेणे मुश्कील झाले आहे.
परिसरातील नागरिकांनी अनेकदा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा हा कचरा डेपो इतरत्र हलवण्याबाबत मागणी केली. मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.
सध्या कोरोनाच्या काळात नागरिकांना मुख्यता श्वसनाचा त्रास होत असताना, आणि रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत असताना येथे मात्र कचरा पेटवून आहे तो ऑक्सिजन दूषित करण्याचे काम सर्रास होत आहे.
पर्यावरण विभाग अनभिज्ञ दरेवाडी येथे असलेल्या या भल्यामोठ्या कचरा डेपोची योग्य विल्हेवाट लावली जाते का किंवा तेथील कचरा २-२ दिवस कसा धगधगत राहतो. त्यातून पर्यावरणाची हानी होत नाही का?
याबाबत याबाबत पर्यावरण विभागाचे अधिकारी अनभिज्ञ असून त्यांनी या डेपोला अद्यापही भेट दिली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचरा डेपोचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.
कॅन्टोन्मेंट विभागाने तातडीने यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर ग्रामस्थ संचारबंदी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील.
– लहू बेरड, ग्रामस्थदरेवाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असून कचरा डेपोच्या धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण होत आहे.
यातून रुग्णांच्या आरोग्याला धोका झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. कचरा डेपोची योग्य विल्हेवाट न लावल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू.
– प्रकाश गायकवाड, तालुकाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना उन्हाळ्यात येथील कचरा पेटण्याचे प्रकार होतात. मात्र लवकरच कॅन्टोन्मेंट बोर्ड तेथे कुंपण भिंत घालत आहे.
भिंत झाल्यानंतर नागरिकांचा त्रास कमी होईल. -विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|