अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यपातळीवर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.
यातच सध्या राज्यात लसीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. यातच राज्यात देखील मोफत लसीकरण केले जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोफत लसीकरणाचं श्रेय घेण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांना फटकारले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. थोरात म्हणाले कि, मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे.
नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे.
मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असं थोरात म्हणाले.
मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|