स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाला वाचवण्याची डॉक्टरांची धडपड सर्वांसाठी प्रेरणादायक.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-  स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाला वाचवण्याची डॉ. शंकर केदार यांची धडपड कोरोना विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणा बनली आहे. स्नेहालय परिवारातील सर्व संस्था आणि कार्यकर्त्यांनी 16 महिन्यांपूर्वी मिशन राहत सुरू केले.

कोरोना संसर्गाचा सर्वंकष मुकाबला करण्यासाठी मिशन राहत विकसित झाले. सध्या या अभियानाचा पाचवा टप्पा सुरू आहे. त्यात 130 रुग्णांचे संपूर्ण मोफत अनाम प्रेम कोवीड केअर सेंटर अहमदनगर शहर आणि तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.

टाकळी खातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. शंकर केदार अनाम प्रेम कोवीड सेंटरचे संचालन करतात. सरुबाई मल्हारी मोरे , (50 वर्षे ) ही महिला निंबळक बायपास रस्त्यावरील शिंदे वस्ती येथे राहते.

तेथे तिच्या घराशेजारील रस्त्यालगत सरुबाई कोविडमुळे अत्यवस्थ होऊन पडल्याचे समजले. त्यांचे सर्व कुटुंबीय करोना संसर्गामुळे आजारी होते . त्यातच 2 दिवसांपूर्वी तिशीतील त्यांच्या तरुण मुलाचे योग्य उपचार आणि रुग्णालय न मिळाल्याने करोनाने निधन झाले.

सुनबाई आणि 8 वर्षाचा नातवाला रोजंदारीने कुटुंब चालवणाऱ्या सरुबाई यांचाच आधार उरला होता. सरुबाई यांचे पती 10 वर्षापूर्वी अपघातात मरण पावले होते.

मुलगा गेल्याच्या दुःखात आणि त्याच्या क्रियाकर्म करताना सरूबाई यांना स्वतःचे उपचार करता आले नाहीत. आर्थिक संसाधने नसल्याने एच.आर. सी. टी. सारख्या तपासण्या देखील करता आल्या नाहीत.

निंबळक ग्रामपंचायतीचे सदस्य भालचंद्र शिंदे यांनी डॉ. केदार यांना अत्यवस्थ झालेल्या सरुबाई ची माहिती दिली.तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर बघण्यासाठी ते बाहेर आले होते. स्नेहालयचे अजित कुलकर्णी यांच्यासह तेथूनच डॉ.केदार त्वरित सरुबाई कडे आले.

डॉ. केदार यांनी येथे कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. स्टेथोस्कोप, हँडग्लोज ,पी पी ई किट, काहीच सोबत नसताना त्यांनी कोरोना बाधित सरुबाईला तपासले. त्यांच्या खिशातील ऑक्सीजन पल्स मिटर मुळे समजले की, सरुबाई यांचा 02 केवळ 51आहे.

डॉ.केदार यांनी युद्ध पातळीवर हालचाली करून सरुबाई साठी जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड मिळण्याची व्यवस्था केली. अनामप्रेम सी सी सी ची रुग्णवाहिका मागवली. अवघ्या दहा मिनिटात ती आली. सरुबाईला हात लावायला लोक घाबरत होते.

डॉक्टर केदार यांनी तिला स्वतःच्या हातानेच उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचताना दारातच सरुबाईने शेवटचा श्वास घेतला.

तिच्या 8 वर्षाच्या नातवाची आणि सुनेची जबाबदारी स्नेहालय परिवाराने घ्यावी, म्हणून डॉ.केदार यांनी लगेचच विनंती केली. कोरोनामुळे सध्या मृत्यू चे तांडव सुरू आहे.

या कठीण स्थितीत आपल्या सहृदय वर्तणुकीने डॉ. केदार यांच्यासारखे शासकीय सेवेतील डॉक्टर्स वैद्यकीय सेवेची विश्‍वासार्हता वाढवीत असतात, अशी प्रतिक्रिया स्नेहालय परिवाराचे संजय गुगळे,श्याम आसावा, अनाम प्रेम चे अजित माने, विष्णू वारकरी, हेल्पिंग हँगर्स संस्थेचे नाना भोरे यांनी व्यक्त केली.

मिशन राहत मिशन राहत हा विविध सामाजिक संस्थां-संघटनांचा एकत्रित उपक्रम आहे. या अंतर्गत ऑक्सीजन- रेमिडी सिवीर ची कमतरता आणि काळाबाजार रोखण्यासाठी सत्याग्रह आणि जनआंदोलन,

खाजगी आणि सरकारी रुग्णालयात गरीब रुग्णांना ऑक्सीजन बेड आणि व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठीचा संवाद आणि समन्वय, कोविड बाधितांची मृत्यू नंतरही होणारी परवड-लुटमार थांबवायला सुरू झालेले मानव सन्मान अभियान, यांचा समावेश आहे.

लवकरच ऑक्सीजेन चे बेड, ऑक्सीजन कॉन्सट्रेशन मशीन त्यांचाही समावेश मिशन राहत मध्ये होणार असल्याचे अनिल गावडे आणि प्रवीण मुत्याल यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe